गुरुवार, १७ एप्रिल, २०१४

आज मतदानाचा दिवस १७ एप्रिल २०१४

मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो!!!. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया!!! हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी.

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. तद्वतच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना चेतविण्याची नितांत गरज आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. सांगली जिल्ह्यातही या विशेष दिनानिमित्त 20 जानेवारीपासून जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी आयोजन, जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व ज्युनियर कॉलेज मधून युवक-युवतींसाठी मतदान करणे का गरजेचे या विषयावर प्रबोधन करणारी व्याख्याने, निबंध स्पर्धा, शाहीरांच्या पोवाड्यातून जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेषत: 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जाणार आहे.

यंदाच्या वर्षीच आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला मतदान करण्याच्या किंवा त्यांनी मतदानाचा हक्क बजवावा या प्रक्रीयेत शंभर टक्के सहभागी करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या सर्वांना टपाल मत पत्रिका, निवडणूक कार्य प्रमाणपत्र यांच्या सहाय्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत गुंतल्यामुळे बहुतांशी अधिकारी व कर्मचारी मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहात असायचे पण आता यंदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा