बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

पिंपळगाव मध्ये नागपंचमी उत्सवाबाबत

नागोबाला भाऊ मानणा - या मराठी महिलांचं नागपंचमीशी जिव्हाळ्याचं नातं. या सणाच्या निमित्ताने येणारे चार विसाव्याचे क्षण तिच्या आयुष्यात आनंद फुलवतात. लोकगीतांमधून या भावना उत्कटतेने उमटलेल्या दिसतात.
........
श्रावण श्रावण मास हा सणांचा राजा म्हणून गणला जातो. श्रावणाने सगळ्यात कठोर तप केल्याने जास्तीतजास्त व्रतवैकल्यं आणि सण याच मासात साजरी केली जातील असा वर त्याला मिळाल्याचं सांगितलं जातं. खरोखरच श्रावणात अनेकविध सण-उत्सव साजरे करताना व्रतांचं पालनही केलं जातं. त्यामुळेच श्रावणमासाशी स्त्रियांचं जिव्हाळ्याचं नातं असतं.
श्रावण शुद्ध पंचमीला येणारा नागपंचमीचा सण आजही ग्रामीण स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचा सण मानला जातो. कारण या सणाच्या निमित्ताने सासुरवाशिणी माहेरी आलेल्या असतात. पंचमीच्या आदल्या दिवशी माहेरच्यांना सुखी ठेवण्यासाठी या माहेरवाशिणी व्रत ठेवतात. स्त्रियांच्या मनातील भावना आपल्याला लोकगीतांच्या माध्यमातून अनुभवता येतात. नागपंचमीच्या निमित्ताने गावातल्या माहेरवाशिणी ठराविक चक्रातून फिरणाऱ्या स्त्री मनाला दिलासा तर मिळतोच पण भावनांना वाटही मिळते.
माहेरी जाण्यासाठी आपल्याला बोलावणं येईल म्हणून मग सासुरवाशीण आतूरतेने वाट पाहत असते. ती म्हणते,
सणामंदी सण नागपंचमी खेळायची
वाट पाहते बोलायाची
एकादस पारणं बहीण धरते भावाचं
नागोबा देवाचं काय होईल जिवाचं
पंचमीच्या दिवशी नागोबाला पऊतं
सोड कुणब्या आऊत
पंचमीचा सण नागाला दूध लाह्या
आऊक्ष मागूया भाऊराया
नागपंचमीच्या दिवशी माहेरी आलेल्या स्त्रियांचं मन आनंदून जातं. त्या दिवशी पूजेची जय्यत तयारी करतात.
सरावण मासामंदी आला पंचमीचा सण
आनंदलं मन्ह अन
सारविल्या भिंतीवरी काढीला नागोबा
दूध लाह्या वाहू त्याला
त्या दिवशी स्त्रिया पाटावर चंदनाने नागाची चित्रं काढतात. काही ठिकाणी भिंतीवर शेणाने चित्रं काढली जातात. ही तयारी सुरू असताना तिचं मन म्हणत असतं,
पंचमीचा सण
फुलांचे हार गजरे
दह्या दुधाच्या वाट्या
दारामंदी पूजीते
नागोबा नटवा
दुरडी लाह्याची पाठवा
जाईजुईची फुलं
सये नागोबाची मुलं
नागोबा मी पूजीला
पाठी भाऊ मागितला
या दिवशी स्त्रिया नव्या साड्या नेसून, मुली परकर पोलकं घालून नटूनथटून तयार होतात. मग सगळ्या जणी गाणी गात एकत्र वारुळाला जायला निघतात.
चल ग सये वारुळाला, नागोबाला पूजायला
हळदकुंकू वाहायाला ताज्या लाह्या वेचायाला
जमूनिया साऱ्या जणी जाऊ बाई न्हवणा
जिथं पाय ठेवू बाई तिथं उठल दवणा
नागाला भाऊ मानून स्त्रिया उपवास करतात, पूजा करतात, मग या भावाचं किती कौतुक करू असे त्यांना होते.
नागोबा संगट पूजा केली नागिणीची
वाटी देत फुटाण्याची
पंचमीच्या दिवशी घाली ना वेणीफणी
पूजीला नागफणी
पंचमीच्या दिवशी काजळ घालिना
नाग येणार पाव्हणा
पंचमीच्या दिवशी निवद उकडीचा
नागोबाचा आवडीचा
एका गीतात पंचमीच्या दिवशी वारुळाला जाताना नवी साडी हवी म्हणून विठ्ठलाकडे हट्ट धरून बसलेल्या रुक्मिणीचं चित्र आहे. एकूण स्त्रीच्या स्वभावधर्मानुसार नटण्याची नवीन साडीची आवड देवतांनाही असावी.
अशी वसली पंढरी
वाळवंटी पुंडलिक हरी
तिथून पुंडलिक झडकिला
गेला रुक्मिणीच्या वाड्या
रुकमाबाई गं सुंदर
जाऊ वारुळा गुजरी
तिथून रुक्मिणी झडकिली ऱ्हाईबाईच्या वाड्या गेली...
नाग, साप शेतकऱ्याचा मित्र असतो. त्यामुळे त्याच्याविषयीचा आदर भाव ही या स्त्रिया व्यक्त करतात आणि त्याला भूतदया दाखवावी, असा संदेश देतात.
नागपंचमीला, नागा चंदनाचे गंध।
तुटती भावबंध, पुजणाऱ्यांचे।।
नागपंचमीला, नागाला घालू दूध।।
होईल बुद्धी शुद्ध, नागकृपे।।
नागपंचमीला, नको चिरू भाजीपाला।
दया शिकवू हाताला, आज सये।।
ही लोकगीतं म्हणजे मराठी भाषेचं स्त्रीधन आहे. ग्रामीण भागातील सामान्य स्त्रियांच्या मनातील विविध भावभावनांचा आविष्कार या गीतांमधून अनुभवता येतो. सामान्य स्त्रियांच्या साध्या, सरळ भावनांमुळे या गीतांना वेगळाच साज चढतो. सहजसुंदर ओघवती शैली, पारदर्शकता, साधं मन, सरळता, स्वाभाविकता हे या गाण्यांचं वैशिष्ट्य. या गीतांमधून त्या त्या काळचं लोकजीवनही अनुभवता येतं. आधुनिक जीवनशैली स्वीकारलेल्या शहरवासीयांकडून हे लोकवाङ्मय दुर्लक्षिलं गेलं आहे, पण हा महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी माणसाचा समृद्ध वारसा आहे हे विसरता कामा नये.

रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

पिंपळगाव मध्ये व्यायामशाळेचे उदघाटन.....

२० जुलै २०१३:-
शिवसेनेचे लोकप्रिय खासदार मा.श्री. आढळराव पाटील यांच्या खासदार निधीतून पिंपळगाव (खडकी) गावामध्ये "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यायामशाळा " चे उद्-घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी, मान्यवर आणि पिंपळगाव मधील तरुण शिवसैनिक.
 या कार्यक्रमप्रसंगी  मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी आपले मत भाषणातून व्यक्त केले त्याच प्रमाणे खासदारांच्या हस्ते  मान्यवरांचा व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. आढळरावांनी विकासाचे राजकारण व्हावे असे मत त्यांच्या भाषणातून व्यक्त केले.
या सर्व कार्यक्रमाचे संयोजन पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य मा.श्री. सचिन बांगर यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी घेतलेले काही छायाचित्रे.....